article
आमच्याविषयी
मनमाडकरांना एकत्र आणणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी व्यासपीठ.
नमस्कार,
ज्या गावात आपण जन्मलो, वाढलो, शिक्षण घेतले आणि जीवनाचे व्यावहारिक ज्ञान मिळवले, त्या गावाचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मात्र, त्या गावातील लोकांची सेवा करून आपण त्या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. याच भावनेतून एमएससी ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.
या ग्रुपच्या स्थापनेमागे एक भावनिक आठवणही आहे. तब्बल १९ वर्षांपूर्वी उच्च पदावर पोहोचलेल्या एका मित्राने गावाकडून साधा सत्कारही झाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्या भावनेतून काही महिन्यांतच आम्ही मनमाड येथे ‘आम्ही मनमाडकर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात मनमाडचे असून विविध क्षेत्रांत देशभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६४ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सलग १२ तास चाललेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाविषयी आपण पुढे सविस्तर चर्चा करू.
मात्र, एमएससी ग्रुप स्थापन करण्यामागे हे एकमेव कारण नव्हते. आपल्या समाजातील अनेकांना रोजगार, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मार्गदर्शन आणि इतर विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पत्रकार म्हणून मला अशा अनेक व्यक्तींचे फोन दररोज येत असतात. शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. कधी यश मिळते, तर कधी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. तरीही हे आपले कर्तव्य आहे, या भावनेने हे काम सुरू असते.
क्लब स्थापन्याअगोदर सुध्दा नाशिकमध्ये आम्ही कोजागिरी, हुरडा पार्टी, नववर्ष स्वागत असे विविध कार्यक्रम नियमितपणे आयोजित करतोच. काही दिवसांपूर्वी ताई संमेलन केले. या कार्यक्रमांमध्ये साधारण ५० ते १५० जण सहभागी होत असत. आता एमएससी ग्रुपचे कार्यक्षेत्र आणि स्वरूप मोठे होत असल्याने जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याचे सहकार्य, सहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.
एकीमध्ये आणि संघटित शक्तीत किती मोठे सामर्थ्य असते, याची जाणीव काल प्राथमिक एमओयू चर्चेदरम्यान प्रकर्षाने झाली. ही तर केवळ सुरुवात आहे. आपण सर्वांनी सकारात्मक विचार करून एकत्रितपणे काम केले, तर त्यातून अनेक संधी, फायदे आणि आनंद आपल्याला निश्चितच मिळतील.
धन्यवाद.