सह्याद्री हॉस्पिटलसोबत मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचा सामंजस्य करार
मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्यात सोमवारी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचा मसुदा वैद्यकीय क्षेत्रातील योगेश बागरेचा, नितीन इंदलकर, महेश चव्हाण तसेच इतर सदस्यांना दाखवून त्यांच्या सूचना घेण्यात आल्या.
यानंतर ग्रुपचे अध्यक्ष गौतम हिरण आणि सचिव ॲड. हेमंत सोनवणे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर ग्रुपच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेजवळ आणि गौतम संचेती यांनी हा करार सह्याद्री हॉस्पिटलचे प्रतिनिधी चेतन जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. आता सह्याद्री हॉस्पिटलच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाकडून अंतिम मंजुरी व स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा करार अधिकृतपणे लागू होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या सामंजस्य करारामुळे मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपच्या सदस्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सेवांवर विशेष सवलती आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. सवलतींचे स्वरूप, अटी व त्याचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया लवकरच ग्रुपवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.